येरवडा, हडपसरमध्ये ४००० चौरस फुटांवरील अतिक्रमण हटवले; जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत शेड जमीनदोस्त; शेकडो वस्तू जप्त

0
IMG_20250627_122418.jpg

पुणे, दि. २७ जून — शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाने गुरुवारी जोरदार कारवाई करत तब्बल ४००० चौरस फुटांचे कच्चे-पक्के शेड जमीनदोस्त केले. यावेळी विविध साहित्य आणि व्यवसायिक वस्तू जप्त करण्यात आल्या.

येरवडा-कळस-धानोरी आणि हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही कारवाई मोठ्या बंदोबस्तात पार पडली. यावेळी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अनधिकृत बांधकामे आणि रस्ते, पदपथांवरील अतिक्रमण हटवण्यात आले.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली. उपायुक्त संदीप खलाटे, माधव जगताप, सहायक आयुक्त अशोक भंवरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत १८ बिगारी सेवक, ३ ट्रक, एक जेसीबी सहभागी झाले होते.

येरवडा विभागात म्हस्केवस्ती ते फुलेनगर व विश्रांतवाडी ते फाईव्ह नाईन चौक या मार्गांवरील अतिक्रमण हटवण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी व पादचाऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे.

या कारवाईत १ हातगाडी, ३ काउंटर, ६ पथारी, खुर्च्या, १ स्टॉल व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

दरम्यान, हडपसर-मुंढवा विभागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत सोलापूर रोड, सासवड रोड, काळेपडळ, चिंतामणीनगर, महंमदवाडी, हांडेवाडी भागात मोठी कारवाई झाली.

या ठिकाणी १८ हातगाड्या, ११० पथारी, ३९ शेड, २ काउंटर, १ स्टॉल आणि ३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.

ही कारवाई अतिक्रमण निरीक्षक राकेश काची, सहायक निरीक्षक कुणाल मुंढे, साईनाथ निकम, अभिलाष कांबळे, वामन सुद्रिक, माधव बहिरम व मध्यवर्ती पथकाचे सौरभ सरोदे, निशांत सावंत, तुषार कदम यांच्या उपस्थितीत पार पडली.

“शहरात कुठेही अनधिकृत बांधकामे वा व्यवसाय आढळल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी असे बांधकाम वा व्यवसाय टाळावा,”
असे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे यांनी केले आहे.

महापालिकेच्या कारवाया पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed