खासगी मोबाईलवरून ई-चलान पाठवणाऱ्या वाहतूक पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार!

मुंबई, दि. ९ जुलै: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईत नियमबाह्य पद्धतीने खासगी मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी यासंदर्भात परिपत्रकाद्वारे स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
राज्यातील विविध वाहतूक संघटनांकडून झालेल्या तक्रारीनंतर आणि परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै रोजी विधान भवनात झालेल्या बैठकीनंतर ही कारवाई करण्यात येत आहे. या बैठकीत वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी वाहनचालकांच्या संदर्भात होणाऱ्या अन्यायकारक ई-चलान प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली होती.
अधिकृत ई-चलान यंत्रणा उपलब्ध असतानाही अनेक वाहतूक पोलिस खासगी मोबाईल फोनच्या माध्यमातून वाहनांचे छायाचित्रे काढून, आपल्या सोयीप्रमाणे नंतर ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करत असल्याचे आढळले. काही पोलिस तर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात वाहनांचे फोटो काढून नंतरच चलान तयार करत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांना फक्त अधिकृत ई-चलान यंत्रणाच वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी मोबाईलचा वापर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे साळुंके यांनी आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
पूर्वीही याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्या दुर्लक्षित केल्या गेल्यामुळे आता कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. वाहतूक पोलीस दलातील शिस्त आणि पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
—