डॉ. मानसिंग साबळे यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. मानसिंग साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आली असून, आरोग्य सेवा आणि प्रशासनाच्या समन्वयासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
डॉ. साबळे ससून रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात संवेदनशीलता, कौशल्य आणि सेवाभाव दाखवत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. याआधी त्यांनी अधिष्ठाता कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि वैद्यकीय दृष्टिकोनाचा फायदा आता जिल्हास्तरीय कामकाजात होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने करण्यात आली असून, या कक्षामार्फत निधीचा पारदर्शक आणि लोकाभिमुख वापर सुनिश्चित केला जातो. जिल्ह्यातील विविध धर्मादाय रुग्णालये, वैद्यकीय संस्था आणि समाजसेवी संघटनांशी समन्वय साधून गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळवून देणे हा या कक्षाचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. साबळे यांची ही नियुक्ती ही केवळ पदभार नसून, सामाजिक बांधिलकीची जबाबदारी आहे. त्यांनी यापूर्वी अनेक गरीब रुग्णांना स्वतः पुढाकार घेऊन मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधिक प्रभावी आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासकीय योजनांचा लाभ न मिळालेल्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरणार असून, डॉ. साबळे यांची नियुक्ती पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.