दौंड-कलबुर्गी शटल रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रवासी सेवा संघ सोलापूरकडून पाठपुरावा
सोलापूर: प्रवासी सेवा संघ सोलापूरकडून सातत्याने मागणी होत असलेली दौंड-कलबुर्गी-दौंड शटल रेल्वे सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी संघाच्या प्रतिनिधींनी सोलापूर रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संघाचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव संजय चौगुले, आणि कोषाध्यक्ष नंदू दळवी यांनी शनिवार, ९ नोव्हेंबर २०२४ रोजी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्याशी सकारात्मक विचारविनिमय केला.
दीपावलीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या शटल सेवेला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या प्रतिसादामुळे सोलापूर रेल्वे विभागाने वरिष्ठ रेल्वे प्रशासनाकडे शटल सेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी सकारात्मक अहवाल पाठविला आहे.
प्रवासी सेवा संघाच्या म्हणण्यानुसार, शटल सेवेच्या यशस्वीतेसाठी स्थानकांवर कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. या कामगिरीबद्दल संघटनेने सर्व स्टेशन संघटक, कार्यकर्ते, आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
संघटना पुढील काळातही दौंड-कलबुर्गी शटल सेवा कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे. प्रवाशांच्या हितासाठी ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि प्रवासी संघटनांमधील सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
संजय पाटील – अध्यक्ष
संजय चौगुले – सचिव
नंदू दळवी – कोषाध्यक्ष
प्रवासी सेवा संघ, सोलापूर