पुण्यात गुन्हेगारीला आळा; पोलिसांचा मोठा निर्णय – वाचा सविस्तर

पुणे: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून पुणे शहरात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती आणि अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांकडून सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
पुणे शहराचा विस्तार वाढल्यामुळे पोलिसांवर वाढता कामाचा ताण आहे. शहरातील खून, लैंगिक अत्याचार, दरोडे, आणि गॅंगवॉर सारख्या गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने पोलीस दलाची क्षमता अपुरी पडत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सात नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी आणि 816 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
यामध्ये नांदेड सिटी, आंबेगाव, खराडी, काळेपडळ, फुरसुंगी, वाघोली आणि बाणेर येथे नवीन पोलीस ठाणे उभारली जाणार आहेत. यासाठी सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, बंडगार्डन पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या सर्व पोलीस ठाण्यांचा भूमिपूजन सोहळा लवकरच आयोजित केला जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.