गोपनीय माहिती लीक, सोशल मीडियावर पोस्ट केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई; सामान्य प्रशासन विभागाची नविन सूचना

मुंबई | प्रतिनिधी
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि कडक सूचना जारी केल्या आहेत. गोपनीय माहितीचा प्रसार, खोट्या बातम्यांचा सोशल मीडियावर प्रचार, तसेच समाज माध्यमांवर शासकीय धोरणांवर टीका करणे या बाबींवर सरकारने बंदी घातली असून, अशा प्रकारांमध्ये सहभागी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर एक परिपत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियावर पोस्ट करताना शासनाच्या धोरणांचे उल्लंघन करू शकत नाही.
या बाबींसाठी खास निर्बंध
▪ गोपनीय शासकीय माहिती सार्वजनिक करणे
▪ खोटी किंवा अप्रामाणिक माहिती प्रसारित करणे
▪ जाती, धर्म, भाषा, प्रांत, सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणारा मजकूर पोस्ट करणे
▪ वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावरून शासनविरोधी किंवा गैरसमज पसरवणारी मते व्यक्त करणे
परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही माहिती पोस्ट करण्यापूर्वी ती शासनाने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेली आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा चुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण होतो.
शिस्तभंगाची कारवाई होणार
सूचनांचे उल्लंघन झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून त्यात निलंबन, वेतन कपात, पदोन्नती थांबविणे अशा कठोर उपायांचा समावेश असणार आहे.
या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेमधील शिस्त राखली जाणे अपेक्षित असून, समाज माध्यमांवरून गैरसमज आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याचा सरकारचा उद्देश आहे.
—