शहरातील शाळांना आज सुट्टी; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
पुणे: हवामान विभागाने पुणे शहर आणि परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, २६ जुलै २०२४ रोजी पुणे शहर, पिंपरी चिंचवड भाग तसेच भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
हवामान विभागाने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्यामुळे, २६ जुलै रोजी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
सद्यस्थितीत, पुणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी तासांमध्ये पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे पुणे शहराच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करावे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.