बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे स्टेशन परिसरात वाहतूक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे : बुद्ध पौर्णिमेनिमित्त १२ मे रोजी (सोमवार) पुणे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादनासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी या बदलांचा विचार करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे स्टेशन परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याने साधू वासवानी चौकाकडे जाणारा मार्ग सोमवारी दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी याऐवजी बोलाई चौक, पुणे स्टेशन आणि अलंकार चौक या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.