दिवाळीपूर्वी बांधकाम कामगारांसाठी बोनसची घोषणा; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : राज्यातील ५४ लाखांहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यंदाच्या दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला असून, याबद्दलची माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक शंकर पुजारी यांनी दिली.
शंकर पुजारी यांनी सांगितले की, नोंदणीकृत सर्व बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांचा बोनस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकर निधीतून वितरित केला जाणार आहे. यासाठी एकूण २७१९ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बोनस मिळण्यासाठी कामगारांनी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी आझाद मैदानात आंदोलन केले होते. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करून, उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनाही बोनस देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निवेदन देण्यात आले होते.
पूर्वीच्या कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी सरकारकडून झालेली नव्हती. न्यायालयीन आदेशानंतर तीन वर्षांपूर्वी शासनाने बोनसबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता.
अखेर मंत्रिमंडळ बैठकीत, कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत व सक्रिय असलेल्या कामगारांना ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला. १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत मंडळात नोंदणीकृत असलेले २८ लाख ७३ हजार ५६८ कामगार तसेच नोंदणी व नुतनीकरण प्रक्रियेत असलेले २५ लाख ६५ हजार १७ कामगार, अशा एकूण ५४ लाख ३८ हजार ५८५ कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
I am working