पुण्यात बेकायदा फ्लेक्स लावलात तर तयार रहा!
महापालिकेचा कडक इशारा – दंड थेट १० ते १५ हजार रुपये

0
IMG_20251209_135511.jpg

पुणे – आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढत असलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. प्रति फ्लेक्स १,००० रुपयांच्या दंडाऐवजी आता १० ते १५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केला आहे.

शहरात वाढत्या प्रमाणात होणारी बॅनरबाजी, राजकीय फ्लेक्सबाजी आणि त्यातून होणारे शहराचे विद्रुपीकरण ध्यानात घेऊन ही कारवाई तातडीने अंमलात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अनधिकृत फलकांवर पोलिसांत गुन्हे दाखल होणार

आयुक्त राम म्हणाले,
“कोणत्याही प्रकारच्या बेकायदा फ्लेक्सबाबत कोणालाही सवलत दिली जाणार नाही. अनधिकृत फलक लावणाऱ्यांविरोधात महापालिकेतर्फे थेट पोलिसांत गुन्हे नोंदवले जातील.”

दोन ते तीन दिवसांत शहरात कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असून याचे परिणाम लवकरच दिसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परवानगीशिवाय फलक लावणे बेकायदा; शहर विद्रूप होत असल्याची नाराजी

शहरातील अनेक रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात राजकीय शुभेच्छा, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच निवडणुकीच्या प्रचाराचे फ्लेक्स उभारले जात आहेत.
यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, परवानगी न घेता उभारलेले फलक केवळ शहराचे सौंदर्य बिघडवत नाहीत तर महापालिकेच्या उत्पन्नालाही तडा देतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून फ्लेक्सबाजी वाढली; प्रशासनाची बैठक

प्रमुख चौकांमध्ये वाढत असलेल्या बेकायदा फलकांच्या तक्रारींवर सोमवारी संबंधित विभागाची बैठक घेण्यात आली.
आयुक्तांनी यापूर्वी लागू असलेला १,००० रुपयांचा दंड वाढवून १०,००० ते १५,००० रुपये करण्याचे आदेश दिले. तसेच, दोषींवर गुन्हे नोंदवण्याची सूचनाही देण्यात आली.

कारवाई थंडावल्याने उचलले राजकीय फ्लेक्स?

दिवाळीपूर्वी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर बेकायदा फलक हटवले होते. मात्र त्यानंतर कारवाई मंदावली.
याचा गैरफायदा घेत महापालिका निवडणुकीचे इच्छुक विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स उभारत असल्याची नागरिकांकडून तक्रार केली जात आहे.

नागरिकांची नाराजी

शहरातील रहिवाशांनी व्यक्त केलेल्या काही प्रमुख तक्रारी :

प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये विद्युत खांबांवर फ्लेक्सची सरबत्ती

राजकीय इच्छुकांकडून मोठ्या आकाराचे फलक

परवानगीशिवाय उभारले जाणारे बॅनर

महापालिकेकडून कारवाईसंदर्भात टाळाटाळ

महापालिकेच्या नव्या निर्णयाने बेकायदा फलक उभारणाऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पुढील काही दिवसांत शहरातील फ्लेक्सबाजीला आळा बसतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed