पुणे स्पीकरचा दणदणाट टाळा, अन्यथा कायदेशीर कारवाई – पोलिसांचा इशारा
पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश्य आवाजाच्या विरोधात पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकांच्या भिंती उभ्या करून होणाऱ्या दणदणाटावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देत, ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळे आणि ध्वनियंत्रणा चालकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या संदर्भात महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१, च्या कलम ३६ नुसार निर्बंध लागू केले आहेत. या आदेशानुसार, निवासी भागात दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल पेक्षा जास्त आवाज करणाऱ्या मंडळांवर पोलिस कारवाई करणार आहेत. हे निर्बंध ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान लागू असतील.
गेल्या वर्षी गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत प्रचंड आवाजामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’नेही गेल्या वर्षभरात या समस्येवर प्रकाश टाकला होता. दहीहंडीप्रमाणे यंदा गणेशोत्सवातही पोलिसांची कारवाई कठोर असण्याची शक्यता आहे.
**कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न**
गणेशोत्सवातील ध्वनियंत्रणांच्या अतिवापरामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असे सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.