पुण्यातील अतिक्रमण कारवाई थंडावली; महापालिकेने शंभर निरीक्षकांची भरती करूनही प्रश्न कायम

0

पुणे – ‘शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करा’, असे फर्मान केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सोडले असले तरी अद्याप महापालिका प्रशासनाने काहीच हालचाल सुरू केलेली नाही. महापालिकेने गेल्यावर्षी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांच्या १०० जागांची भरती केल्यानंतर प्रभावी कारवाई होईल, असे वाटले होते.

प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात रस्त्यावरील, पादचारी मार्गावरील अतिक्रमणांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील प्रमुख रस्ते, गावठाणांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. रस्ता, पादचारी मार्गांवर मोकळी जागा दिसली की लगेच तिथे अतिक्रमण करून व्यवसाय केला जात आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह अनेक प्रकारचे व्यवसाय रस्त्यावर केले जात आहेत. वाहनांसाठी पार्किंगच्या आरक्षित जागेवरही हातगाडे, स्टॉल लावले जात असल्याने रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे.

त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (ता. ८) महापालिकेत घेतलेल्या बैठकीमध्ये रस्ते आणि पादचारी मार्ग त्वरित अतिक्रमण मुक्त करा, नागरिकांना चालण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, राजकीय लोकांनी दबाव आणला तरी कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत. त्यानंतरही अजून प्रशासन ‘ॲक्शन’ मोडमध्ये आलेले नाही.

अतिक्रमणाची कारवाई प्रभावीपणे करता यावी यासाठी दोन वर्षापूर्वी महापालिकेने १०० सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांची भरती केली आहे. त्यांची १५क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे रस्‍त्यावरील अतिक्रमणांवर प्रतिबंध बसेल, असे वाटले होते. पण कारवाईऐवजी शहरातील पथारी, हातगाड्यांची संख्या वाढली आहे. दुकानांच्या बाहेरची जागा भाड्याने देऊन तेथे स्टॉल लावले जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

आयुक्त म्हणतात मनुष्यबळ कमी
अनेक अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक वर्षानुवर्षे एकाच भागात काम करत आहेत. त्यांच्याकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आयुक्त म्हणाले, ‘अतिक्रमण निरीक्षक वर्षानुवर्षे एकाच जागेवर आहेत. त्यांची बदली करेपर्यंत त्यांचे लागेबांधे तुटणार नाहीत, तो पर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना केल्या आहेत. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांची भरती केली असली तरीही हे मनुष्यबळ कमी पडत आहे.’

अन् कारवाईची मिळते टीप
महापालिकेचे अतिक्रमण पथक कारवाईसाठी निघाले की याची टीप स्टॉलधारक, हातगाडी, पथारी व्यावसायिकांना मिळते. दुकानदार त्यांचे दुकानाबाहेरील साहित्य आतमध्ये घेतात. त्यामुळे अवघ्या ५-१० मिनिटांत रस्त्यावरील अनधिकृत व्यावसायिक गायब होतात. अतिक्रमण पथकाची गाडी निघून गेल्यानंतर परत रस्ता अतिक्रमणांनी गजबजून जातो. अतिक्रमण पथकातील कर्मचारीच ही टीप देत असल्याने महापालिका केवळ दिखाऊ कारवाई करते.

Link source: Sakal online

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed