पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस! शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील यांच्यावर नवा गुन्हा दाखल

0
IMG_20251107_112602.jpg

पुणे : शहरातील जमीन घोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकत्याच चर्चेत आलेल्या कोरेगाव पार्क जमीन प्रकरणानंतर आता पुण्यातील आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याच्या आरोपावरून शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात हेमंत गोवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, विद्यानंद पुराणिक आणि जयश्री एकबोटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या घोटाळ्याशी संबंधित शासकीय अधिकारी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना कालच निलंबित करण्यात आले असून त्यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यात बोपोडी येथील सुमारे पाच हेक्टर शासकीय जमिनीचा अपहार करून ती खासगी कंपनी ‘व्हिजन प्रॉपर्टी’ला देण्यात आल्याचा आरोप आहे. कृषी विभागाने संबंधित जमिन सरकारी असल्याचा स्पष्ट आदेश दिला असतानाही तो आदेश डावलण्यात आला होता.

दरम्यान, कोरेगाव पार्कमधील अमेडिया इंटरप्राइजेस एलएलपी कंपनीच्या माध्यमातून झालेल्या संशयास्पद जमीन खरेदीप्रकरणातही हेच भागीदार – दिग्विजय अमरसिंह पाटील आणि शीतल तेजवाणी – यांची नावे पुढे आली होती. त्या प्रकरणात निलंबित सह-दुय्यम निबंधक आर. बी. तारू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सलग दोन प्रकरणांत एकाच व्यक्तींची नावे समोर आल्याने पुण्यातील भूमाफियांच्या साखळी व्यवहारांचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply