पुणे: आरपीआय (आठवले) शहराध्यक्षपदी शैलेश चव्हाण यांची निवड; नाराजीच्या पार्श्वभूमीवर पक्षात फेरबदल
पुणे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या पुणे शहर कार्यकर्त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत शैलेश चव्हाण यांची पुणे शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पक्षात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तत्कालीन शहराध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडला, जो बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून शैलेश चव्हाण यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीत रामदास आठवले यांच्या तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी चे आभार मानण्याचाही ठराव यावेळी संमत झाला.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत रिपब्लिकन नेते जगन्नाथ गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. नगरसेविका हिमाली कांबळे यांची महानगरपालिकेतील गटनेतेपदी, तर निलेश आल्हाट यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड, आसित गांगुर्डे, प्रदेश सदस्य अशोक शिरोळे, अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुराव घाडगे, महेंद्र कांबळे, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष रफिक दफेदार, भगवान गायकवाड तसेच कोर कमिटी सदस्य वसंत बनसोडे, महादेव दंडी, महादेव कांबळे, सुगत धसाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशोक कांबळे यांनी ठरावाचे वाचन केले, तर अशोक शिरोळे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. पुणे शहर सरचिटणीस महादेव कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. शहरातील विविध मतदारसंघांतील पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुखही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.