पुणे: गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू; तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर
पुणे: शहरातील घरगुती एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत राज्य व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) सुरू केले आहेत. नागरिकांना गॅस संदर्भातील अडचणी तत्काळ सोडवता याव्यात, यासाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
प्रशासनाने थेट सूचना जारी करत नागरिकांना आवाहन केले आहे की, गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर न मिळणे, सिलिंडरचे वजन न तपासणे किंवा गॅस लिकेज तपासणी न करणे यांसारख्या तक्रारी असल्यास त्वरित नोंद करावी.
यासाठी विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक ९७६९९१९२२१ उपलब्ध करून देण्यात आला असून, नागरिकांनी या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रारींची दखल घेऊन संबंधित एजन्सींवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही गैरप्रकारास बळी न पडता आपल्या हक्कांसाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.