येरवड्यात सार्वजनिक शौचालयांबाहेर अंधाराचे साम्राज्य; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
येरवडा : येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरील सार्वजनिक शौचालयांच्या परिसरात पथदिव्यांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाशेजारील सार्वजनिक शौचालय, तारकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांजवळील शौचालय, विसर्जन घाट रोडवरील शौचालय तसेच पांडूला मानवस्तीला जाणाऱ्या रस्त्यावरील शौचालय परिसर पूर्णतः अंधारात असल्याचे चित्र आहे.




विशेषतः रात्रीच्या वेळी महिला व वृद्ध नागरिकांना शौचालयाचा वापर करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंधारामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, महिलांना जीव मुठीत घेऊन शौचालयात जावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात पथदिवे नसल्याने असामाजिक तत्वांचा वावर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित पथदिवा विभागाकडून दुरुस्ती किंवा नवीन पथदिवे बसवण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पथदिवा विभाग जाणीवपूर्वक कामात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सार्वजनिक शौचालय ही मूलभूत गरज असून, त्याठिकाणी प्रकाशव्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालय व महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून या ठिकाणी पथदिवे बसवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की आपल्या परिसरातील मुख्य रस्त्यांवरील किंवा वस्त्यांमधील पथदिवे बंद असल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी.
तक्रारीसाठी संपर्क :
राजेश तनपुरे अभियंता : 74101 03898
श्रीमती मनीषा शेकटकर – मुख्य अभियंता (विद्युत) : 96899 31279
राजेश गुर्रम – सहाय्यक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय : 96899 31278