कारंजा चौक की गुन्हेगारी चौक? अक्कलकोटच्या मध्यभागी कोयत्याचा कहर, शहरात दहशत

0
pudharinews_2025-06-04_yn5ib43l_Koyata-Gang.jpg

अक्कलकोट : शहराच्या मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या कारंजा चौकात शनिवारी सायंकाळी जे घडले, ते पाहता हा चौक आता ‘वाहतुकीचा’ की ‘हत्यारांचा’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून पाच जणांनी एकत्र येत, थेट कोयता आणि काचेच्या बाटलीने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. या थरारक घटनेमुळे अक्कलकोट शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संध्याकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास, नेहमी गजबजलेल्या कारंजा चौकात अमीर सय्यद खान (वय ३५, रा. माणिक पेठ) हे उभे असताना, आरोपी हातात कोयते व काचेच्या बाटल्या घेऊन खुलेआम शिवीगाळ आणि आरडाओरडा करत फिरत होते. शहराच्या मध्यभागी असे हत्यार घेऊन फिरण्याचे धाडस होत असेल, तर पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती, असा सवाल उपस्थित होत आहे.

“गेल्या वर्षी आमच्याविरोधात तूच पोलिसांना माहिती दिलीस,” असा आरोप करत आरोपींनी अमीर खान यांना गाठले. त्यानंतर कायदेशीर मार्ग निवडण्याऐवजी, थेट गच्ची धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, साहिल शेख याने लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केला, तर सोहेल शेख याने काचेच्या बाटलीने डोक्याच्या डाव्या बाजूस घाव घातला. जणू काही मध्यवर्ती चौक नव्हे, तर गुन्हेगारीचा आखाडाच!

या हल्ल्यात अमीर खान गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटना रात्री घडूनही गुन्हा तब्बल १०.४८ वाजता नोंदविण्यात आला. त्यामुळे ‘तक्रार, तपास आणि तत्परता’ याबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एकीकडे शहर सुरक्षित असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे चौकाचौकात कोयते निघत असतील, तर सामान्य नागरिकांनी नेमका कुणावर विश्वास ठेवायचा? कारंजा चौकातील ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून, ती अक्कलकोटच्या कायदा-सुव्यवस्थेवर झालेली गंभीर टिप्पणी असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.

गुन्ह्याचा तपास हवालदार राजू कोळी करीत असले, तरी आरोपींवर कठोर कारवाई होणार की पुन्हा ‘नेहमीप्रमाणे’ प्रकरण थंडावणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed