सीमेवरील जवानाने जपले चिमुकल्या बहिणीचे नाते; दुधनीच्या शाळेत रंगला ‘सेना दिन’
दुधनी (अक्कलकोट):
देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती असलेली कृतज्ञता आणि एका चिमुकल्या बहिणीने पाठवलेल्या राखीचा ओलावा, अशा अत्यंत भावूक वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, दुधनी येथे ‘भारतीय सेना दिन’ साजरा करण्यात आला. सीमेवर कार्यरत असलेले वीर जवान श्री. अवधूत नागणे यांनी याप्रसंगी शाळेला सदिच्छा भेट दिली असता, त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.


राखीचा धागा अन् सैनिकाची ओढ
शाळेतील उपक्रमांतर्गत विद्यार्थिनी कु. अनन्या शिवाजी कांबळे हिने देशरक्षकांसाठी राखी पाठवली होती. ही राखी श्री. अवधूत नागणे यांना कर्तव्यावर असताना मिळाली. एका बहिणीचे प्रेम आणि पत्रातील शुभेच्छांनी भारावलेल्या या सैनिकाने सुट्टीवर आल्यावर थेट शाळा गाठली. अनन्याला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत त्यांनी ‘भाऊ-बहिणीचे’ नाते अधिक घट्ट केले. नागणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पत्राचे वाचन केले, तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
लोकप्रतिनिधींचा सन्मान आणि भावनिक साद
या कार्यक्रमात दुधनी नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक श्री. म. रफिक निंबाळकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. जवानांच्या त्यागाविषयी बोलताना निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले. जवानांचे जीवन, त्यांचे कठोर प्रशिक्षण आणि देशासाठी असलेले सर्वोच्च बलिदान हे समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
देशप्रेमाचा जागर कार्यक्रमाचे समन्वयक पोमू राठोड म्हणाले की, “सैनिक आपल्या कुटुंबापेक्षा देशाला प्राधान्य देतो. आजचा हा सोहळा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची बीजं पेरण्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल.” यावेळी महिदिमिया जिडगे, श्री. रविकुमार कोरचगाव आणि श्री. श्रीशैल मलगण यांनीही सैनिकांच्या गौरवास्पद कामगिरीवर प्रकाश टाकला.
या सोहळ्याला अल्लाउद्दीन झळकी, श्रीम. शोभा म्हेत्रे, कु. मंदाकिनी सोनकांबळे यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.