पुणे: एम्प्रेस गार्डन रोड अंधारात; कॅन्टोन्मेंटचा ‘डिसाळ’ कारभार उजेडात! व्हिडिओ
पुणे | प्रतिनिधीपुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील एम्प्रेस गार्डन रोड गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अक्षरशः अंधारात आहे. कारण एकच—पथदिवे बंद! रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता असतानाही कॅन्टोन्मेंट प्रशासनाला याची जाणीव होऊ नये, हेच विशेष. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पथदिवे दुरुस्त न होणे, हा केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील एम्प्रेस गार्डन रोड गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अक्षरशः अंधारात आहे. कारण एकच—पथदिवे बंद! रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता असतानाही कॅन्टोन्मेंट प्रशासनाला याची जाणीव होऊ नये, हेच विशेष. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पथदिवे दुरुस्त न होणे, हा केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पहा व्हिडिओ
विशेष म्हणजे आज ख्रिसमसचा सण असतानाही परिसर अंधारातच आहे. एम्प्रेस गार्डन रोडलगत असलेल्या चर्चमध्ये हजारोच्या संख्येने भाविक ये-जा करत असताना, पथदिव्यांचा उजेड मात्र कुठेच दिसत नाही. ‘प्रभूच्या प्रकाशाचा’ संदेश देणाऱ्या दिवशीही प्रशासनाचा कारभार अंधारातच असल्याची उपरोधिक टीका नागरिकांतून होत आहे.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या या ‘डिसाळ’ कारभारामुळे चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. “इतक्या महिन्यांपासून दिवे बंद असताना या हद्दीतील नगरसेवकांना ते दिसत नाहीत का?” असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. निवडणुका जवळ आल्या की नगरसेवक घरोघरी हात जोडायला येतात, मात्र निवडणूक झाली की साधं बोलायलाही वेळ नसतो, असा टोमणाही नागरिकांनी लगावला आहे.
दरम्यान, आठ दिवसांच्या आत पथदिवे सुरू न झाल्यास पुणे कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआयचे कार्यकर्ते राजेश नायर यांनी दिला आहे. अंधारात ठेवलेल्या रस्त्यांमुळे अपघात घडल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
एम्प्रेस गार्डन रोडवरील पथदिवे नेमके कधी उजळणार, की प्रशासनाला अंधारच अधिक सोयीचा वाटतो—याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.