पुणे: पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर हल्ला; येरवडा पोलीसांची धडाकेबाज कारवाई, रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार जेरबंद – व्हिडिओ
पुणे – येरवडा परिसरातील विलास पेट्रोलियम येथील कर्मचाऱ्याला मारहाण करून दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या. गुंजन चौकात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडिओ
अटक करण्यात आलेल्यांची नावे कृष्णा प्रभाकर नाईक (२५) आणि अक्षय ऊर्फ आबा सुदाम जमदाडे (२५) अशी आहेत. दोघेही गांधीनगर, येरवडा येथील रहिवासी असून यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनाक्रम —
१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आरोपी मोटारसायकलवरून पेट्रोल पंपावर आले. रांग मोडून पुढे येत त्यांनी “आमच्या गाडीत आधी पेट्रोल भरा” अशी दमदाटी केली. कर्मचारी गणेश भराटे (३५, रा. चिंचवड) यांना विरोध केल्याने आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी हत्याराने भराटे यांच्या पाठीवर आणि उजव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. शिवाय “जिवे मारू” अशी धमकी देत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
पोलीसांची कडक भूमिका —
तक्रार मिळताच येरवडा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी त्याच ठिकाणी नेऊन गुडघ्यावर बसवले आणि कर्मचाऱ्यांची माफी मागायला लावली. या कारवाईमुळे कायद्याची भीती निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
येरवडा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त होत असून दहशत पसरविणाऱ्यांना पोलिसांनी दिलेला ‘धडा’ शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलीस दलाचे कौतुक —
या तातडीच्या कारवाईबद्दल पेट्रोल डीलर्स असोसिएशन – पुणे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, डीसीपी निखिल पिंगळे, डीसीपी (झोन 4) सोमय मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि संपूर्ण पथकाचे आभार मानले आहेत.