पुणे: आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा पुन्हा बायोमेट्रिकला ठेंगा!
वरिष्ठ अधिकारी बदलताच शिस्तीचा लगाम सैल, नागरिकांचा त्रास वाढला

saamtv_2022-01_1b0b6199-6382-4c57-a243-fe61923d2957_Saam_Templet_Banner_new__18_.jpg

पुणे : आरोग्य विभागात पुन्हा एकदा “जुनेच ताट, तोच भात” असे चित्र दिसू लागले आहे. वरिष्ठ अधिकारी बदलताच कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरीला ठेंगा दाखवत मनमानी सुरू केली आहे. कार्यालयीन वेळा धाब्यावर बसवून ‘लेट-लतीफ’ कारभार पुन्हा बहरात आला आहे. परिणामी रुग्णसेवा व कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी आरोग्य विभागातील सर्व रुग्णालये, उपकेंद्रे, आरोग्य कार्यालये आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली होती. याशिवाय “हजेरीनुसारच वेतनपत्रक तयार करा” अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी शिस्तीचा लगाम घट्ट असल्याने सर्व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहात होते.

मात्र, नवीन उपसंचालकांनी पदभार स्वीकारताच परिस्थिती उलटी फिरली. हजेरी यंत्रे बंद ठेवणे, वेळेत न येणे आणि कार्यालयीन कामकाजात ढिलाई हे पुन्हा नियमित झाले आहे. काही विभागांमध्ये तर सकाळच्या बाह्यरुग्ण सेवेतही डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती दिसते.

नागरिकांचा त्रास – तक्रारींचा पाऊस
वेळेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना तासन्‌तास वाट पाहावी लागते. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधूनही अशीच तक्रार येत आहे. “डॉक्टर दुपारी येतात, हजेरीवर सही करून निघून जातात,” अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे.

शिस्तीचा बोजवारा – अधिकाऱ्यांकडून मौन
कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे आरोग्यसेवा विस्कळीत होत असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षच होत आहे. “हजेरी तपासण्यासाठी यंत्र बसवली, पण तिच्यावर बोट ठेवणारेच नाहीत,” अशी टोकेरी टिप्पणी विभागातीलच काही कर्मचाऱ्यांनी केली.

आरोग्य विभागातील ही निष्काळजीपणाची साखळी मोडण्यासाठी पुन्हा एकदा ठोस कारवाईची गरज आहे, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा “प्रशासकीय खेळ” थांबणार नाही, असा इशारा जनतेकडून दिला जात आहे.

Spread the love