पुणे: सह्याद्री रुग्णालय प्रकरणात चौकशी की नाट्य? दोन महिने उलटले, पण अहवालाचा पत्ता नाही!

thebridgechronicle_2025-08-25_djztaxdt_Sahyadri-Hospital.jpeg

पुणे : सह्याद्री रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपणानंतर दाता आणि प्राप्तकर्ता अशा दोघांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणाला दोन महिने उलटून गेले तरीही कारवाईचा तवंग दिसत नाही. उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन झाली, बैठकाही झाल्या, चौकशीसाठी रुग्णालयालाही भेट देण्यात आली — पण अहवाल कुठे आहे? प्रशासनातील निष्क्रियतेमुळे या चौकशीचा फार्स सुरू असल्याचीच जनतेत चर्चा आहे.

डेक्कन पोलिसांनी वैद्यकीय हलगर्जीपणाच्या चौकशीसाठी ससून रुग्णालयाला पत्र पाठवले, पण ससूनने हात वर केले. “आमच्याकडे यकृत शल्यचिकित्सक नाहीत,” असा निर्वाळा देत ससूनने नकार दिला. परिणामी चौकशीची धुरा आता मुंबईतील जे. जे. रुग्णालयाकडे सोपवण्यात आली आहे. पुण्यातील मोठ्या वैद्यकीय संस्थांनीच असमर्थता दर्शवली, तर मग सर्वसामान्य रुग्णांचा न्याय कोण देणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

१७ ऑगस्ट रोजी बापू कोमकर यांचे आणि २२ ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी कामिनी कोमकर यांचे निधन झाल्यानंतर कोमकर कुटुंबाने गंभीर वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप केला होता. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही केवळ समित्यांच्या बैठका आणि पत्रव्यवहार यापलीकडे काहीही झालेले नाही.

दरम्यान, चेन्नईच्या प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने २९ ऑगस्ट आणि २७ सप्टेंबरला बैठक घेतली, पण त्यानंतर पूर्ण शांतता! अहवाल “लवकरच सादर होईल” या सरकारी भाषेत गप्पा मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कार्यवाही ठप्प आहे.

या ढिसाळ चौकशीमुळे रुग्णालय प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि आरोग्य विभाग तिघांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत दाम्पत्याच्या कुटुंबीयांनी वारंवार चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली असली, तरी प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद “लवकरच” या शब्दावरच अडकलेला आहे.

दरम्यान, सह्याद्रीतील प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवरील स्थगिती अद्याप कायम असून, अहवाल आल्यानंतरच ती उठवली जाणार असल्याचे समजते. पण अहवाल कधी येणार, आणि न्याय मिळणार तरी कधी?
सरकारी चौकशींच्या या कासवगतीमुळे हे प्रकरण “न्याय की नौटंकी?” या प्रश्नात अडकले आहे.


Spread the love