पुणे: वकील संरक्षण कायद्यासाठी न्यायालयाबाहेर फलक प्रदर्शन; लाल फित लावून वकिलांचा कामकाजात सहभाग
पुणे : राज्यभर वाढत्या वकिलांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आज पुण्यात वकिलांनी न्यायालयाबाहेर निदर्शने केली. ‘वकील वाचला तर न्याय वाचेल’, ‘वकील संरक्षण हा अधिकार मिळवूच’, ‘वकील सुरक्षित, देश सुरक्षित’, ‘आमचा ध्यास – संरक्षण कायदा लागू व्हावा’ अशा घोषणा देत वकिलांनी फलक झळकावले.
या आंदोलनादरम्यान वकिलांनी लाल फित लावून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला. वकील संरक्षण कायद्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या आवाहनाला शहरातील विविध वकील संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या निदर्शनात पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, सदस्य पूनम मावाणी, लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे सचिव विकास कांबळे, माजी चेअरमन पांडुरंग ढोरे पाटील, राणी कांबळे-सोनावणे, अजिंक्य मिरगळ, अमेय बलकवडे, राकेश सोनार, राकेश उत्तेकर, इब्राहिम शेख, निलेश वाघमोडे, आकाश मुसळे, रोहन आठवले, आकाश कामठे, अक्षय शितोळे, उमेश मांजरे, कांताराम नप्ते, सम्राट जांभुळकर आदींसह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागांत वकिलांवर झालेल्या हल्ल्यांमुळे कायदा तातडीने लागू करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. काही वकिलांना या हल्ल्यांमध्ये जीव गमवावा लागला असल्याने कायद्याची गरज अधोरेखित झाली आहे.
वकील संरक्षण कायद्याचा मसुदा ॲडव्होकेट जनरल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे वकिलांनी यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी या आंदोलनातून करण्यात आली.