पुण्यात सर्वपक्षीय महिलांचा संताप; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी जोडेमारो आंदोलन – व्हिडिओ
पुणे | प्रतिनिधी
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात सर्वपक्षीय महिलांनी तीव्र आंदोलन छेडले. गुडलक चौक येथे झालेल्या या आंदोलनात महिला नेत्यांनी चाकणकरांच्या प्रतिमेला जोडेमारो करून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
पहा व्हिडिओ
डॉक्टर युवतीच्या आत्महत्येनंतर चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पीडितेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या निषेधार्थ विविध पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत “चाकणकर राजीनामा द्या” अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचाही सहभाग होता. त्यांनी सांगितले की, “आम्ही दोघी एकाच पक्षात काम करत असलो तरी त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याचे काम करायला हवे होते. मात्र त्यांच्या वक्तव्याने उलट महिलांचा अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”
दरम्यान, काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनीही चाकणकरांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “त्यांचे विधान हे अत्यंत निषेधार्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा येत्या काही दिवसांत यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल.”
गुडलक चौकात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
महत्त्वाचे मुद्दे :
फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप.
गुडलक चौकात सर्वपक्षीय महिलांचे एकत्रित आंदोलन.
रुपाली चाकणकरांच्या प्रतिमेला जोडेमारो.
“राजीनामा द्या”च्या घोषणा; अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा.
राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांचा सहभाग.