शाळांना १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी; २८ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार वर्ग विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरू; उन्हाळी सुट्टी २ मे ते १३ जूनदरम्यान

0
IMG_20251010_135805.jpg

सोलापूर – राज्यातील शाळांमध्ये दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा सुरू झाल्या असून, या परीक्षा १५ ऑक्टोबरपर्यंत पार पडतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना १६ ते २७ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी सुट्टी मिळणार आहे. शासनाने जारी केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार ही सुट्टी निश्चित करण्यात आली आहे. शाळा २८ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत.

राज्यातील शैक्षणिक वर्षात एकूण ५२ रविवारी सुट्टी असते. त्याशिवाय सण, उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकूण ७६ सार्वजनिक सुट्ट्या असतात. उर्वरित २३७ दिवस अध्यापनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यंदा जिल्हा परिषद, महापालिका तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना एकूण १२ दिवसांची दिवाळी सुट्टी मिळणार आहे.

शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचे बदल
दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात द्वितीय सत्र परीक्षा घेतल्या जात असत. मात्र, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) यांनी यावर्षी काही बदल केले आहेत. सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून एकाचवेळी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामागील उद्देश विद्यार्थ्यांचे किमान २२० दिवस अध्यापन सुनिश्चित करणे हा आहे.

शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस २ मे ते १३ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल.

दिवाळीनंतर शिक्षकांना निवडणूक ड्युटी
दिवाळी सुट्टी संपल्यानंतर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान राज्यभरात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असल्याने शिक्षकांना निवडणुकीची कामे सोपविण्यात येणार आहेत.

“प्रथम सत्र परीक्षा १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान पार पडतील. विद्यार्थ्यांना १६ ते २७ ऑक्टोबर दिवाळी सुट्टी राहील. शाळा २८ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होतील.”
— कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Spread the love

Leave a Reply

You may have missed