पुणे: गुरुवारी पुण्यात अनेक भागांत पाणीपुरवठा बंद
देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे महापालिकेचा निर्णय; नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन

0
IMG_20251007_110840.jpg



पुणे : पर्वती आणि वारजे जलकेंद्रांमधील विद्युत पंपिंग व वितरण यंत्रणेच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी (दि. 9) पुण्यातील अनेक भागांत दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (जुने व नवे दोन्ही), वारजे फेज क्रमांक 1 व 2 जलकेंद्र, लष्कर, होळकर, चिखली, एसएनडीटी, चतु:शृंगी परिसरातील जलटाक्या तसेच संबंधित जीएसआर टाकी क्षेत्रांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.

महावितरण विभागाच्या पत्रानुसार, वारजे जलकेंद्रातील 22 केव्ही उच्चदाब बेकर पॅनेलच्या दुरुस्ती व सर्व्हिसिंगचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याच्याशी संबंधित टाक्यांच्या परिसरात देखभाल कामे केली जाणार आहेत.

महापालिकेने नागरिकांना आगाऊ पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शुक्रवारी (दि. 10) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन केले असून, कामे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Spread the love

Leave a Reply