पुण्यात तीन महिला तलाठ्यांवर लाचप्रकरणी कारवाई; खडक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल

पुणे : प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहीत जमिनीच्या सातबारा आणि ‘आठ अ’ उताराच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी हवेली तालुक्यातील तीन महिला तलाठ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
खडक पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई सांगरुळ, बहुली आणि खडकवाडी येथील महिला तलाठ्यांवर करण्यात आली. याबाबत ४२ वर्षीय जमीन खरेदी-विक्री व्यवसायिकाने तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत अनुक्रमे चार हजार, साडेसहा हजार आणि दीड हजार रुपये लाच घेतल्याचे समोर आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत.
—