पुणे: पत्रकारांच्या सुरक्षेसाठी नवी कार्यपद्धती; पुणे पोलिस आयुक्तांचे आश्वासन

0
c57fd073-7b8d-488f-9b35-ee5c0512ddcb_1757322598605.webp

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी पत्रकारांशी गैरवर्तन केल्याच्या घटनेनंतर पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.

या भेटीत पत्रकारांच्या वार्तांकनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी आयुक्तांनी पत्रकारांना वार्तांकनाची योग्य सुविधा व सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आयुक्तांनी सांगितले की, पुढील काळात विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांच्या नियमनासाठी विशेष कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाईल. पथकातील सदस्यांची संख्या मर्यादित ठेवण्याबाबत गणेश मंडळे व ढोल-ताशा पथक संघटनांना सूचना दिल्या जातील. महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई तातडीने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांना दिलेल्या पोलिस पासेसनुसार वार्तांकनाचा हक्क अबाधित राहील, याची कल्पना संबंधितांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांपूर्वी पोलिस आणि पत्रकारांमध्ये सविस्तर चर्चा करून आवश्यक उपाययोजना राबवल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

You may have missed