पुणे महापालिकेतील 626 सुरक्षारक्षक तीन महिन्यांपासून वेतनाविना, कंपनीवर कारवाईची मागणी

IMG_20250812_102108.jpg

पुणे – पुणे महापालिकेत तैनात असलेल्या ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपनीच्या 626 सुरक्षारक्षकांना मे, जून आणि जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. पगार न मिळाल्याने सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून, संबंधित कंपनीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

यापूर्वीही ईगल कंपनीने महापालिकेची फसवणूक केली होती. मुंबईत तैनात 200 सुरक्षारक्षकांचे वेतन महापालिकेकडून घेण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, प्रशासनाने कंपनीकडून 2 कोटी 70 लाख रुपये वसूल केले होते तसेच 71 लाखांचा दंड ठोठावला होता. त्यावेळीही कंपनीने कर्मचार्‍यांचे पगार उशिरा दिले होते.

महापालिकेच्या झोन 1, 2 आणि 5 मध्ये तैनात असलेले सुरक्षारक्षक तीन महिन्यांपासून वेतनाविना आहेत. कर्मचारी प्रतिनिधींनी महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे तक्रारी दाखल करून कंपनीच्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच, कंपनीने महापालिकेकडे जमा केलेली ठेव जप्त करून त्यातून पगार देण्याची मागणी केली जात आहे.

महापालिकेच्या सुरक्षा विभागाने इतर कंपन्यांची बिले वेळेवर येत असल्याचे सांगितले. मात्र, ईगल कंपनीकडून बिले वेळेवर न आल्याने पेमेंट प्रक्रियेत अडथळा येत असल्याचे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी स्पष्ट केले. मार्च आणि एप्रिलची बिले लवकरच पाठवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे की, “तीन महिन्यांपासून पगार नाही, घरखर्च कसा चालवायचा?” — हा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करत आहे.

Spread the love