येरवडा: गॅस आहे पण परवाना नाही! विनापरवाना गॅस साठ्यावर कारवाईचा अभाव; शिवसेना (शिंदे गट) कडून तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे, दि. 14 जुलै 2025 (प्रतिनिधी)
पुणे महानगरपालिकेच्या येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विनापरवाना गॅस साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एजन्सींचा बंदोबस्त न केल्याने शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. गेल्या 7 महिन्यांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत पक्षाच्या वतीने आता तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना (शिंदे गट)चे कार्यकर्ते अशिष मधुकर कांबळे यांनी यासंदर्भात 2 डिसेंबर 2024 रोजी महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (इंडेन), भारत पेट्रोलियम (भारत गॅस) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपी गॅस) या कंपन्यांच्या गॅस सिलेंडर पुरवठ्याशी संबंधित एजन्सीज महापालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता गॅस साठवून व्यवसाय करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
कांबळे यांच्या मते, या अवैध साठवणुकीमुळे शासनाची महसूल हानी तर होतेच आहे, पण यामुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर तक्रारीकडे महापालिकेने सात महिन्यांनंतरही कोणतीही कारवाई केली नाही. उलट संबंधित विभाग फक्त टाळाटाळ करत असल्याची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली.
“संबंधित विभागाने येत्या ८ दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल सादर न केल्यास शिवसेना (शिंदे गट)तर्फे कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा स्पष्ट इशारा कांबळे यांनी निवेदनात दिला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा मुद्दा असतानाही, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांच्या जिवावर बेतू शकणारी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून उत्तरदायित्व सिद्ध करावे, अशी जोरदार मागणी सध्या नागरिकांतून व स्थानिक राजकीय पक्षांकडून होत आहे.