आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून दिलासा; सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ

मुंबई | प्रतिनिधी
राज्यात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा साजरा होत असतानाच विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांसाठी आता ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्याची गरज भासणार नाही. सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे मुद्रांक शुल्क आता माफ करण्यात आले आहे.
हा निर्णय दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच ४ जुलै २०२५ रोजी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केला. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
कुठल्या दस्तऐवजांसाठी लागणार नाही मुद्रांक शुल्क?
या निर्णयामुळे जातपडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आदी दस्तऐवजांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहिलेली नाही. केवळ स्वसाक्षांकित साध्या कागदावर अर्ज करूनही हे दाखले मिळू शकणार आहेत.
यापूर्वी महायुती सरकारनेच मुद्रांक शुल्क १०० रुपयांवरून थेट ५०० रुपये केले होते. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. शुल्क वाढवून सरकार विद्यार्थ्यांना लुटत असल्याचा आरोप विरोधकांकडूनही करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट, सरकारला नमते घ्यावे लागले
मुद्रांक शुल्क वाढीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. विशेषतः दहावी आणि बारावीच्या निकालानंतर दाखल्यांसाठी लागणारा अतिरिक्त खर्च अनेक कुटुंबांवर आर्थिक बोजा बनला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने हा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लवकरच निर्णय अंमलात येणार
हा निर्णय लवकरच अमलात आणला जाणार असून, त्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात होणाऱ्या आर्थिक ओझ्याचा मोठा भार आता कमी होणार आहे.