पुणे: येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; क्षेत्रीय कार्यालयच्या निष्काळजीपणाचा नमुना – दरवाजा गायब!

दरवाजा काढून टाकल्याने प्रशासनाची निष्काळजीपणा उघड
पुणे (प्रतिनिधी) – येरवडा – कळस – धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेला दरवाजा तुटून पडल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवाज्याचा बिजागर तुटल्याने तो निखळला होता. विशेष म्हणजे, प्रशासनाने तो दरवाजा दुरुस्त करण्याऐवजी थेट काढूनच टाकला आहे.
या प्रकारामुळे कर्मचारी तसेच येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक कार्यालयामध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा हा अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. “दरवाजा तुटला, पण त्याचे दुरुस्ती न करता काढूनच टाकणे म्हणजे प्रशासनाची बेफिकीरी आणि दुर्लक्ष स्पष्ट दिसते,” अशी टीका सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते यांनी केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने दरवाजा असणे आवश्यक असतानाही त्याची दुरुस्ती न करता टाळाटाळ केली जात असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणले आहे. नागरिकांनीही या प्रकाराला विरोध दर्शवत त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे.
या प्रकरणी महापालिकेने तातडीने लक्ष घालावे आणि संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.