पुणे: पोर्शे अपघाताला वर्षपूर्ती; कल्याणीनगर-कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांकडून कडक कारवाई

पुणे – गतवर्षी कल्याणीनगर परिसरात घडलेल्या भीषण पोर्शे अपघाताला एक वर्ष पूर्ण होत असतानाच, पुणे पोलिसांनी या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवत, कडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी कंट्रोल रूममधून आलेल्या आदेशानंतर कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि रामवाडी परिसरात पहाटेपर्यंत तपासणी मोहीम राबवण्यात आली.
“दैनिक पुढारीने” दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी संयुक्तपणे प्रत्येक वाहनांची ‘ब्रेथ अॅनालायझर’च्या साहाय्याने तपासणी करत होते. या कारवाईदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. तपासणी पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती.
दैनिक ‘पुढारी’च्या पाहणीत उघड झाले की, कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर भागातील अनेक रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. प्रत्येक चौकात पोलिस गस्त घालत असून, वाहनांच्या क्रमांकांची नोंदणीही करण्यात येत आहे. पब वेळेत बंद होत असल्याचे निदर्शनास आले असले तरी, बाहेर उभ्या असलेल्या तरुणांना पोलिसांनी घरी जाण्याची सूचना दिली.
या भागात अनेक आयटी कंपन्या, पब्स आणि स्पा सेंटर्स असल्याने विकेंडला येथे तरुणांची मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढू नये म्हणून पोलिसांनी ही विशेष मोहीम राबविली असल्याचे स्पष्ट होत आहे.
वाहनचालक कुणाल चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “पोलिसांची ही कारवाई चांगली आहे. गेल्या वर्षीच्या घटनेनंतर आतातरी काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, या कारवाईत सातत्य हवे.”
पोलिसांची ही कडक कारवाई केवळ एकदाच न राहता दर आठवड्याच्या शेवटी नियमितपणे राबवली गेल्यास, अशा दुर्घटनांना आळा घालणे शक्य होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.