पुणे: विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई: मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे, दि. ०१ मे २०२५ – विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा यशस्वी पर्दाफाश केला असून, तीन आरोपींना जामखेड (जि. अहिल्यानगर) येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण १.८५ लाख रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल्स (बुलेट, पल्सर, ज्युपिटर) जप्त करण्यात आल्या आहेत.
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत असताना आरोपी जामखेड भागातील असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोउनि महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस अंमलदार संजय बादरे, संपत भोसले, अमजद शेख, अक्षय चपटे यांच्यासह इतरांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जामखेड परिसरात तपास करून खालील संशयितांना ताब्यात घेतले:
1. आतीक बाबा शेख (२२), रा. कवडगाव, ता. जामखेड
2. बाद नुरमहंमद शेख (२०), रा. पिंपरखेड, ता. जामखेड
3. चेतन ज्ञानेश्वर साळवे (१९), रा. रामगड यस्ती, पुणे
तपासादरम्यान आरोपींकडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ११२/२०२५ व बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७/२०२५ हे दोन गुन्हे उघडकीस आले असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उप-आयुक्त हिंमत जाधव, सह. आयुक्त विठ्ठल दबडे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव आणि गुन्हे निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईबद्दल तपास पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करण्यात येत आहे.