महापालिकेच्या आदेशाला हरताळ; शहरात बेकायदेशीर जाहिरातींचा मारा; आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या बैठकीत कबूल करूनही नियमांची पायमल्ली

पुणे – वादळी वारे व अवकाळी पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे महापालिकेने १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत शहरात कोणतेही जाहिरात बॅनर किंवा होर्डिंग लावू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी होर्डिंगवर जाहिराती झळकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे होर्डिंगधारकांकडून महापालिकेच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाच्या माहितीनुसार, सध्या शहरात सुमारे १,४०० अधिकृत होर्डिंग्ज आहेत. विभागाने होर्डिंगधारकांसोबत बैठक घेऊन बॅनर्स लावण्यास बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या होत्या. बैठकीदरम्यान होर्डिंगधारकांनी सर्व नियमांचे पालन करण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून आली आहे.
वादळी वाऱ्यामुळे धोका वाढलेला
यावर्षी १२ एप्रिल रोजी शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली होती. अशा परिस्थितीत मोठ्या आकाराचे होर्डिंग कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने दोन महिन्यांसाठी होर्डिंग रिकामे ठेवण्याचे आदेश दिले होते. याशिवाय, होर्डिंग्सची सळसळीत तपासणी करून त्यांची संरचना सुरक्षित आहे की नाही, याची खातरजमा करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.
पालनाऐवजी उल्लंघन; महापालिका करणार कारवाई
महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप टेंगळे यांनी सांगितले की, “काही ठिकाणी आदेशांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित होर्डिंगधारकांना पुन्हा एकदा सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतरही नियम पाळले गेले नाहीत, तर कठोर कारवाई केली जाईल.”
महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत जाहिरात लावणाऱ्या एजन्सीजविरोधात आता प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत होर्डिंग्जसंदर्भातील कारवाईच्या बातम्यांना वेग येण्याची शक्यता आहे.