पुण्यातील स्पा सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
पुणे: शहरातील काही स्पा सेंटर्सवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत, विश्रांतवाडी परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकत गुन्हे शाखेच्या भरोसा सेलने मोठी कारवाई केली.
विश्रांतवाडीतील धानोरी जकात नाका परिसरात असलेल्या गुडविल स्क्वेअर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली आणि स्पा सेंटरच्या मॅनेजरसह मालक सूरज भरत शाहू (रा. वाशी, ठाणे) याला अटक केली.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या कारवाईत अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे, आणि पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथक सहभागी होते.
गुन्हे शाखेने अशा बेकायदा व बेशिस्त मसाज सेंटर्सवर कारवाईची मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी बाणेर येथील स्पा सेंटरवर देखील काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती.
महिलांना पैशांचे आमिष
विश्रांतवाडी येथील प्रकरणात महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कडक कारवाईचा इशारा दिला असून, अशा प्रकारच्या बेकायदा व्यवसायांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
शहरातील बेकायदा मसाज सेंटर्सवर पोलिसांचे लक्ष असून, नियमबाह्य कामकाज करणार्यांवर कठोर पावले उचलण्यात येत आहेत.