पुणे: थकबाकीदारांच्या दारात बॅंड वाजवून वसुली; १९ मिळकती सिलबंद
पुणे: पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदार मिळकतधारकांकडून मिळकत कर वसुलीसाठी अनोख्या पद्धतीने मोहीम राबवत बॅंड पथकाची नेमणूक केली आहे. या मोहिमेमुळे अवघ्या तीन दिवसांत तब्बल ९ कोटी २२ हजार ६१२ रुपये इतकी थकबाकी वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.
महापालिकेच्या कर वसुली विभागाने दिनांक २ ते ४ डिसेंबरदरम्यान १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकीदारांच्या १५४ मिळकतींवर कारवाई केली. बॅंड पथकाद्वारे थेट मिळकतींवर जाऊन थकबाकीदारांना कर भरण्यास भाग पाडले गेले. तसेच १९ मिळकती सिलबंद करण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती आहेत. यापैकी ८ लाख ७३ हजार २५७ मिळकतधारकांनी आतापर्यंत १,७९८ कोटी रुपये कर भरला आहे. मात्र उर्वरित मिळकत धारकांकडून थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत.
थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट:
कर आकारणी व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मिळकत कर वसुलीसाठी बॅंड पथकाचा समावेश असलेली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून उर्वरित थकबाकी वसुलीसाठी लवकरच आणखी मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.
थकबाकीदारांना इशारा:
“ज्यांनी अद्यापही मिळकत कर भरलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर कर भरावा. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिला आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे थकबाकीदारांवर दबाव वाढत असून, कर वसुलीत चांगली प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे.