मतदार यादी महाराष्ट्र 2024 : मतदार ओळखपत्र हरवलं? नवीन कार्ड मिळवण्यासाठी जाणून घ्या सोप्या स्टेप्स!
पुणे – निवडणुकीच्या प्रचारसभांचा धुरळा जोरात उडाला असून, मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी मतदारांनी त्यांच्या नावाची मतदार यादीत नोंद आहे की नाही हे त्वरित तपासून पाहणे गरजेचे आहे. भारतीय निवडणूक आयोगाने यासाठी नागरिकांसाठी सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मतदार यादीत नाव कसं तपासाल?
मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी आयोगाने https://electoralsearch.in या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे तुम्हाला तुमच्या नावाची आणि मतदान केंद्राची माहिती मिळू शकते. तसेच, निवडणूक आयोगाचे अॅप वापरून तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.
मतदार कार्ड हरवलं किंवा नाही मिळालं?
जर तुमचं मतदार कार्ड हरवलं, विसरलात, किंवा अद्याप मिळालं नाही, तरी तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता. आयोगाने मान्यता दिलेल्या खालील 11 ओळखपत्रांपैकी कोणतंही एक ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर केल्यास तुम्हाला मतदान करता येईल.
मतदानासाठी मान्यताप्राप्त ओळखपत्रं
1. पासपोर्ट
2. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम)
4. बँक किंवा पोस्टाच्या छायाचित्र असलेल्या पासबुक
5. पॅनकार्ड
6. मनरेगा जॉबकार्ड
7. कामगार मंत्रालयाचं आरोग्य विमा स्मार्टकार्ड
8. निवृत्तीवेतन दस्तावेज
9. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्यांसाठीचं ओळखपत्र
10. आधारकार्ड
11. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत स्मार्टकार्ड
प्रत्येक मतदाराचा हक्क महत्त्वाचा
18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. हा हक्क बजावण्यासाठी नाव मतदार यादीत आहे की नाही, ते तपासणं आणि आवश्यक कागदपत्रं तयार ठेवणं महत्त्वाचं आहे. मतदानाचा हक्क बजावणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
नागरिकांनी तयार राहा
मतदानाचा हक्क गमावू नका. वेळेत नाव नोंदणी करून किंवा यादीत नाव तपासून निवडणुकीसाठी सज्ज व्हा. तुमचा हक्क बजावण्यासाठी तयार राहा!