“ससून रुग्णालयात रोबोटची एंट्री; सरकारी वैद्यकीय सेवेत प्रगती” शस्त्रक्रियांची खर्च आणि वेळेत बचत” वाचा सविस्तर
पुणे : बोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियांमध्ये अचूकता वाढली असून, यामुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचा वापर वाढताना दिसत आहे, आणि आता ससून रुग्णालयाच्या सर्जरी विभागात देखील रोबोट उपलब्ध होणार आहे.
ससून हे भारतीय बनावटीचा रोबोट खरेदी करणारे राज्यातील पहिले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. तंत्रज्ञानाच्या अचूकता आणि वेदनारहिततेमुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या खासगी रुग्णालयांमध्ये मुख्यत: सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये रोबोटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
आता हर्निया, गॉल ब्लॅडर, पोटाच्या समस्या, तसेच गायनॅकॉलिजकल शस्त्रक्रियाही रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जात आहेत. ससून रुग्णालयात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रायोगिक तत्त्वावर रोबोटिक आर्मच्या सहाय्याने पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. आता रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरात ससून रुग्णालयाने पुढचे पाऊल उचलले आहे.
देशभरात रोबोटिक सर्जरीसाठी विविध प्रयोग सुरू आहेत. मात्र, रोबोटिक सर्जरी अत्यंत खर्चीक असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येतो, जो गरीब रुग्णांसाठी परवडणारा नसतो. त्यामुळे ससून रुग्णालयातील रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.
डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय: “आगामी एक-दोन महिन्यांत रुग्णांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया उपलब्ध होतील. भारतीय बनावटीचा हा रोबोट डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर कार्यान्वित केला जाईल, ज्याचा मोठ्या प्रमाणात फायदा रुग्णांना होईल.”
डॉ. अनंत बिडकर, शल्यचिकित्सा विभागप्रमुख: “रोबोटिक शस्त्रक्रिया हे अत्याधुनिक तंत्र आहे, जे संगणक कन्सोलवर बसलेल्या शल्यविशारदाद्वारे नियंत्रित केले जाते. रोबोटिक प्रणालीमुळे ३ ते ५ हात एकाच वेळी शल्यविशारदाच्या नियंत्रणाखाली अत्यंत कार्यक्षमतेने काम करू शकतात.”