पूजा खेडकर प्रकरणाचा अंतिम निर्णय आज अपेक्षित; काय मिळणार, संरक्षण की अटक?
नवी दिल्लीः बनावट कागदपत्रांच्या आधारे यूपीएससी परीक्षेतून आयएएस पद मिळवणाऱ्या पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे, आणि या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षेसाठी अतिरिक्त संधी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर केली होती. यात तिने आपले नाव बदलून शासनाची फसवणूक केली, तसेच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पालकांपासून वेगळं दाखवणारं खोटं प्रमाणपत्र तयार केलं. त्याचबरोबर तिने बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोपही तिच्यावर आहे.
यामुळे यूपीएससीने खेडकरविरोधात गुन्हा दाखल करून तिचं आयएएस पद रद्द केलं आहे. तरीही, न्यायालयाने आतापर्यंत तिला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत दिल्ली पोलिस आणि यूपीएससीने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रत्येक तारखेस तिला मिळणाऱ्या अटकेपासूनच्या संरक्षणामुळे पुढील सुनावणीपर्यंत ती मुक्त राहू शकली आहे. त्यामुळे शुक्रवारी काय निर्णय येईल, याबाबत उत्सुकता आहे.