महापालिकेतील नोकरीचं आकर्षण संपलं! महापालिकेतील नोकरीला रामराम! वर्षभरात ७१ कर्मचाऱ्यांचा राजीनामा
पुणे – पुणे महापालिकेच्या तब्बल ७१ कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात नोकरीला रामराम ठोकल्याचे समोर आले आहे. वाढते नागरीकरण, कामाचा वाढता व्याप, बदलती शासकीय कार्यपद्धती, आणि मानसिक ताण यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे सांगत अनेकांनी नोकरी सोडली आहे. यातून महापालिकेतील नोकरीचे आकर्षण कमी होत चालल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, जुन्या कर्मचाऱ्यांपैकी १३ जणांनी निवृत्तीपूर्व स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे. आकडेवारी पाहता प्रत्येक पाच दिवसांत एक कर्मचारी महापालिकेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या दशकभरात न्यायालयीन वाद आणि सेवा प्रवेश नियमावली अंतिम नसल्याने महापालिकेत मोठ्या प्रमाणात नोकरभरती रोखली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी टाकण्यात आली होती.
शासनाने नोकरभरतीवरील बंदी हटवल्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेत ४४८ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, ज्यामध्ये १३५ कनिष्ठ अभियंत्यांच्या जागांसह विविध पदांचा समावेश होता. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात ३२० जागांची भरती पूर्ण करण्यात आली. यामुळे ८०८ पदे भरली गेली असली तरी, लिपिक, कनिष्ठ अभियंता, फायरमन, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांसारख्या पदांवरील ७१ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने अनेक जागा पुन्हा रिक्त झाल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांकडे ओढा
महापालिकेतील नोकरी सोडणाऱ्या कर्मचारी वर्गात स्पर्धा परीक्षा देणारे तरुण मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांनी अन्य शासकीय सेवांमध्ये संधी साधण्याचा मार्ग अवलंबला आहे. उच्च पदावर नियुक्ती मिळाल्याने हे कर्मचारी महापालिकेतील पदांचा त्याग करत आहेत.
महापालिकेची अडचण वाढली
कर्मचारी आणि अधिकारी नोकरी सोडून गेल्यानंतर त्या पदांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्याचे नियोजन असले तरी, बरेच कर्मचारी एक वर्ष पूर्ण करूनच राजीनामा देत असल्याने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे महापालिकेच्या कामकाजात अडचण निर्माण होत आहे.
नोकरी सोडणाऱ्यांची आकडेवारी
लिपिक – ३७
फायरमन – ८
औषध निर्माता – २
वाहन निरीक्षक – २
कनिष्ठ अभियंता – १०
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक – ९
विभागीय वैद्यकीय अधिकारी – ३
स्वेच्छा निवृत्ती – १३