Water Supply : पुण्यातील या भागाचा पाणी पुरवठा शनिवारी राहणार बंद

पुणे, २५ ऑक्टोबर: शहरातील जलकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेने गेल्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. मात्र, अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आलेले नाही. त्यातच, शनिवारी (दि. २६) रामटेकडी भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या पंपिंग लाइनवर आवश्यक देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्याचा परिणाम रामटेकडीसह अनेक भागांत होणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या भागांमध्ये रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, मुंढवा, मगरपट्टा, हडपसर, कृष्णा नगर, एन.आय.बी.एम. रोड, उंड्री रोड, ससाणे नगर, काळेपडळ आदी परिसरांचा समावेश आहे.
या भागातील नागरिकांना शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा उपलब्ध होणार नाही. तसेच, दुसऱ्या दिवशी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. ऐन निवडणूक काळात करण्यात आलेल्या या दुरुस्तीमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.