दुधनी मराठी शाळेतील शाळा समितीची यशस्वी सभा: शैक्षणिक विकासावर भर
दुधनी (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा, दुधनी येथे 17 ऑक्टोबर 2024 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्षपद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गोरखनाथ धोडमनी यांनी भूषवले.
मुख्याध्यापक श्री. मलगन एसपी यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे स्वागत करत सभेची सुरुवात केली. अजेंडाचे वाचन श्री. कोरचगाव सरांनी केले व मागील सभेचा वृत्तांतही सादर केला. यावेळी शाळेने विविध उपक्रमांत मिळवलेल्या यशाबद्दल सर्व सदस्यांनी शाळेचे अभिनंदन केले.
विशेषतः, यंदाच्या टॅलेंट हंट स्पर्धेतील लोकनृत्य स्पर्धेत शाळेने केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तालुका स्तरावर पोहोचल्याबद्दल शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या यशस्वी प्रवासात योगदान दिल्याबद्दल श्रीमती गुंजोटे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घेतल्याबद्दल म्हेत्रे मॅडम यांनाही गौरवण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. हणमंत कलशेट्टी यांनी शिक्षकांचे कौतुक केले, तर सदस्य श्री. मिहीदिमिया जिडगे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
तालुका पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. पोमू राठोड यांनी पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभेच्या शेवटी श्री. कोरचगाव सर यांनी आभार प्रदर्शन केले.