पुणे: जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांकडून डमी कर्मचारी नेमले जात असल्याची गंभीर तक्रार
पुणे : जिल्हा परिषदेतील काही विभागांमध्ये अधिकृत नियुक्ती नसतानाही कर्मचारी काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंत्राटी करार संपला असूनही काही माजी कंत्राटी कर्मचारी आणि ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी अद्यापही काम करत आहेत. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील काही कर्मचारीच पगार देत असून त्यांच्याकडून खासगी कामे करून घेतली जात आहेत.
जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कालावधी सुरू असल्याने कोणत्याही विभागाला सभापती नाही. त्यामुळे काही अधिकारी मनमानीपणे विभाग चालवत आहेत आणि काही ठिकाणी कर्मचारीच विभाग प्रमुखाच्या भूमिकेत वावरत असल्याच्या तक्रारी आहेत. याच दरम्यान, काही विभागांत डमी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे, ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कालावधी संपूनही, काही जण लिपिकांच्या मर्जीने अजूनही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात काम करत आहेत. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव देणे हा असला तरी, त्याचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे.
कार्यवाहीची मागणी या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी प्रतिक्रिया देत अशा प्रकारांवर चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.