मध्यरात्रीनंतर रेल्वे स्टेशनवरील रिक्षांची ‘डेंजर’ प्रवासाची कहाणी

पुणे: रात्री १२ वाजल्यानंतर रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने प्रवास करणे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. कारण मनाला वाटेल ते भाडे सांगून रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करत आहेत. भाडे ऐकून काही क्षण प्रवाशांचे डोळे पांढरे होतात, असे चित्र दिसून येत आहे.
प्रवाशांची गैरसोय एवढी वाढली आहे की, बाहेरगावाहून रात्री उशिरा येणाऱ्या महिलांना घेण्यासाठी नातेवाईक स्वतः दुचाकी किंवा चारचाकी घेऊन येतात. रिक्षाचालकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे, असे स्पष्ट होते.
रिक्षाचालकांच्या बेशिस्तीने प्रवासी त्रस्त
रेल्वे स्टेशनवर जास्त प्रवाशांची गर्दी असते, आणि या ठिकाणी रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तणुकीचा फटका प्रवाशांना बसतो. विशेषतः मध्यरात्रीनंतर रिक्षाचालकांची अरेरावी वाढत चालली आहे. “महाराष्ट्र माझा”च्या बातमीदाराने गुरुवारी (दि.२९) रात्री रेल्वे स्टेशनवर घेतलेल्या आढाव्यात, काही रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धटपणे वागत असल्याचे आढळले. मात्र, काही रिक्षाचालक प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचेही दिसून आले.
तपासणी मोहिमेची गरज
प्रवाशांच्या या त्रासाला आळा घालण्यासाठी, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी रिक्षांची तपासणी मोहीम हाती घेण्याची मागणी जोर धरत आहे. अशा मोहिमांमुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकतो, असे प्रवासी वर्गाचे म्हणणे आहे.