पुणे शहर: पंतप्रधान येणार म्हणून खड्डे बुजवले जातायत; पुणेकर मात्र अद्याप त्रस्त
पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपतींची नाराजी; प्रशासनाला धक्का, मात्र सुधारणा केव्हा?
पुणे: पुणे शहरातील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था हे रोजचेच चित्र झाले आहे. याच रस्त्यांवरून जात असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना त्रास झाल्याने त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शहरातील प्रशासनाचे कान टोचले गेले आहेत.
राष्ट्रपतींच्या या नाराजीमुळे प्रशासनाने तत्काळ हालचाल केली असली, तरी प्रश्न कायम आहे – ही सुधारणा केवळ व्हीआयपींच्या दौऱ्यापुरतीच का? पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 सप्टेंबरच्या पुणे दौऱ्यापूर्वी प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. पोलिसांनी पुणे महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची विनंती केली आहे.
पण नेहमीच्या पुणेकरांसाठी अशी तत्परता कधी? या खड्ड्यांमुळे दररोज पुणेकरांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. सर्वसामान्य पुणेकरांना देखील प्रशासनाने समान महत्त्व द्यावे, अशी मागणी वाढत आहे.
खड्डे मुक्तीचे आश्वासन अपुरे; ॲप देखील ‘खड्ड्यात’
पुणे महानगरपालिकेने वेळोवेळी कोट्यवधींचा निधी खर्च करून देखील खड्डे बुजवण्याचे काम अपूर्ण राहिले आहे. महापालिकेने खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी ॲप तयार करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सहा महिन्यांनंतरही हे ॲप विकसित होण्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मात्र असे ॲप तयार करून नागरिकांच्या सेवेत आणले आहे.