“भ्रष्टाचाराचा अड्डा पुणे पालिकेचा खड्डा..” म्हणत आपने पथ विभागाच्या कार्यालयासमोर केली निदर्शने – व्हिडिओ
पुणे – महापालिकेच्या पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या कार्यालयात आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी “भ्रष्टाचाराचा अड्डा, पुणे पालिकेचा खड्डा” अशा घोषणांसह निदर्शने केली.
आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले की, “वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. भाजपचे लाडके ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांना घाबरवतात का? नव्याने बनवलेले रस्ते एका वर्षात खराब होतात आणि बुजवलेले खड्डे पाच दिवसांत पुन्हा उघडतात. भाजपच्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा अंदाज आता पुणेकरांना आला आहे.”
पहा व्हिडिओ
आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा संयम आता संपल्याचे त्यांनी सांगितले. “आंदोलने, फोन कॉल्स, पत्रव्यवहार करूनही समस्या सुटत नाहीत. शेवटी, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून ती टेबलवर ठेवली. पाच दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर पालिकेला टाळे ठोकू,” असा इशारा महासचिव सतीश यादव यांनी दिला. त्यांनी हेही म्हटले की, “महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे, पण भाजपच्या काळात पुणे शहराची नाचक्की वाढत आहे.”
या आंदोलनात शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, महिला आघाडी अध्यक्ष भोसले, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, अमित मस्के, निलेश वांजळे, शंकर पोटघन, सुभाष करांडे, विकास चव्हाण, कानिफनाथ घोरपडे, किरण साठे, अविनाश भाकरे, संतोष काळे, उमेश बागडे, अभिजीत गायकवाड, ऋषिकेश मारणे, गुणाजी मोरे, सुरेखा भोसले आणि शंकर थोरात यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.