पुणे परिसरातील 32 गावांसाठी विक्रीची जाहिरात – बॅनर पाहून खळबळ
पुण्यातील 32 गावांमध्ये “गाव विकणे आहे” बॅनरची चर्चा, ग्रामस्थांचा महापालिकेच्या कर धोरणावर निषेध
पुणे: पुण्यातील 32 गावांमध्ये “गाव विकणे आहे” या बॅनरने खळबळ माजवली आहे. महापालिकेच्या जुलमी कर धोरणाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, पुणे महापालिकेला आपले गाव विकत घेण्याचे खुले आव्हान दिले आहे. “महापालिकेने कोणत्याही सुविधा न पुरवता जास्तीचे कर लादले आहेत, त्यामुळे आमच्या गावांवर हा बॅनर लावावा लागला आहे,” असे ग्रामस्थ सांगतात.
या गावांमध्ये धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, आणि कोपरे यांचा समावेश आहे. या गावांतील ग्रामस्थ “आम्ही कर भरू शकत नाही, तुम्ही आमचे गावच विकत घ्या” या मागणीसाठी आवाज उठवत आहेत. या निषेध मोहिमेची चर्चा पुणे शहरभर पसरली असून, पुढील काही दिवसात या गावांमधील ग्रामस्थ मोठ्या आंदोलनाची तयारी करत आहेत.
बीडच्या 140 गावांमध्ये पाण्यासाठी संघर्ष, मोठ्या आंदोलनाची तयारी
बीड: सिंदफणा नदीकाठच्या 140 गावांमध्ये नाथसागरातील पाणी सोडावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी लढ्याची चळवळ सुरू केली आहे. या प्रश्नावर बैठका घेतल्या जात असून, छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणही करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही योग्य निर्णय न झाल्यास पन्नास हजार गावकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पैठण येथील नाथसागरातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडल्यास 140 गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी करत हे आंदोलन जोर धरत आहे.