पुणे: तलाठी कार्यालयातील ढिसाळ कारभार: नागरिकांना महिनों महिने प्रतीक्षा
पुणे: हडपसर तलाठी कार्यालयातील नोंदी फेरफार कामकाजात अनागोंदी उघड झाली आहे. रजिस्टर दस्त सात महिने (२१० दिवस) आधी जमा केल्यावरही तलाठ्याने अद्याप नोंदींचा फेरफार केला नाही. सुमारे शेकडो मृत व्यक्तींच्या वारसांना वारस नोंदीच्या कामासाठी वाट पाहायला लावण्यात येत असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.
नागरिकांचा आरोप आहे की, “प्रोटोकॉल केला तरच काम होईल, नाहीतर आप कतार मे है” असा अनुभव तलाठी कार्यालयात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कोणतीही कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
“पुणे प्राईम न्यूज”कडे नागरिकांनी सुपूर्द केलेल्या पुराव्यानुसार, मृत व्यक्तींच्या वारसांची फेरफार नोंदीसाठी अर्ज केलेले प्रकरणं, रजिस्टर दस्त जमा करूनही फेरफाराची नोंद धरली जात नाही. याशिवाय, बँकेचे कर्ज व्याजासह परतफेड करूनही 7/12 उताऱ्यावर बोजा कमी करण्यास विलंब केला जात असल्याची तक्रार आहे.
वारस नोंदीच्या फेरफारासाठी तलाठी कार्यालयातील विलंबाने नागरिक वैतागले आहेत. “प्रोटोकॉल शिवाय काम होत नाही” अशा कारभारामुळे महसूल विभागाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देतील की तलाठ्याच्या चुकीवर पांघरूण घालतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
हडपसर तलाठी कार्यालयातील हा गोंधळ वरिष्ठ अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने, “प्रोटोकॉल करणाऱ्यांचे काम लगेच होते, पण इतरांना महिनों महिने प्रतीक्षा करावी लागते,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
यावर मंडल अधिकारी शेखर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, “तलाठ्यांना वारस नोंदी आणि इतर फेरफार कामे त्वरीत करण्यास सांगण्यात येईल. नागरिकांना विलंब होणार नाही, आणि ज्यांची कामे थांबवली आहेत त्यांनी मंडल अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.”