पुणे: आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या विभाजनावरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष, १८ सप्टेंबरपासून बेमुदत संपाची हाक
पुणे – आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या विभाजनासंदर्भात दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बीडचे सुपुत्र डॉ. राधाकिशन पवार यांनी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची दिशाभूल करीत, ठाणे, पालघर, रायगड, सातारा आणि सोलापूर येथे कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाचे आदेश काढल्याचा आरोप आहे.
या आदेशामुळे मुंबई आणि पुणे येथील आरोग्य सेवा आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांचे स्थायिक ठिकाण बदलण्यात आले असून, यामुळे सुमारे ११०० कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, सेवाजेष्ठता, बदली, अनुकंपा, तक्रारी आणि न्यायालयीन प्रकरणांसारख्या अनेक प्रशासकीय बाबी अडचणीत आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष व्यक्त करत, १८ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सब ऑर्डिनेट असोसिएशन आणि मेडीकल डिपार्टमेंन्ट मिनीस्टियल स्टाफ असोसिएशन यांनी सरकारला पूर्वीच नोटीस दिली आहे. जर आरोग्य सेवेवर या संपाचा परिणाम झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.